Saturday, August 20, 2011

[Marathi_Katha] देवीदेवतांपासूनच भ्रष्टाचाराचा उगम

 

    भ्रष्टाचाराचा मुद्दा आता व्यापक प्रमाणावर ऐरणीवर आला असला तरी माणसाची भ्रष्टाचारी वृत्ती आता इतक्यातच  किंवा गेल्या काही वर्षातच जन्माला आलेली नाही. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार अस्तित्वातच नव्हता असेही  समजण्याचे कारण नाही. आमचे पूर्वज अत्यंत चारित्र्यवान होते, असे जर कोणी सांगत असेल तर ती सुद्धा लबाडी आहे कारण आर्थिक भ्रष्टाचार हा मनुष्य जातीच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून किंवा मनुष्य जातीच्या  जन्माच्या आधीपासूनच अस्तित्वात होता, याचे पुरावे आहेत. देवदेवता लाचखोरीच्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. एखादा शासकीय अधिकारी स्वतःची नैतिकमुल्ये जपण्यासाठी एक छदामही न घेता जनतेची कामे करतो,  असे दृश्य तुरळक असले तरी दुर्मिळ नाही. मात्र बिना धूप-दीप-आरतीशिवाय प्रसन्न होणारी देवता सापडणे कठीण आहे. एखाद्याजवळ देवाला देण्यासारखे काहीच नसेल, अगदी फूल-अगरबत्तीही देण्याची परिस्थिती नसेल तर निदान भक्तिभाव तरी अर्पण करावाच लागतो, त्याशिवाय देव काही प्रसन्न होत नाही.

             काही देवतांना प्रसन्न करण्यासाठी कोंबडी, बकरी किंवा डुक्कर यासारख्या प्राण्यांचा बळी द्यावा लागतो. त्यापैकी काही देवता तर फारच अडेलतट्टू असतात. नरबळीखेरीज त्यांना दुसरे काहीच चालत नाही. देवतांची कृपादृष्टी हवी असेल तर त्यांना हे सगळे द्यावेच लागते. नाही दिले तर त्या प्रसन्न होत नाहीत आणि याचकाचे कल्याणसुद्धा करत नाहीत. मात्र या तर्‍हेच्या देवता पुजा अर्चना न केल्यास प्रसन्न होत नाही पण याचकाचे निष्कारण वाईटही करत नाही. अशा तर्‍हेच्या "प्रसन्न देवता" या वर्गवारीत मोडणार्‍या देवतांचे गणित साधेसुधे असते. त्यांचे भक्तांना एकच सांगणे असते "आशीर्वाद हवा असेल तर खिसा सैल करा, नाही तर हवा खा." 
               मात्र काही देवता वेगळ्याच म्हणजे "ओंगळ देवता" या वर्गवारीत मोडणार्‍या असतात. अशा देवतांचे स्वरूप फारच वेगळे असते. इथे याचकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याला किंवा मर्जीला अजिबात स्थान नसते. ठरल्याप्रमाणे वर्षातून एकदा तरी त्यांची पुजा करावीच लागते. दहीभात, मलिंदा, कोंबडी, बकरी यापैकी काहीना काहीतरी त्यांना द्यावेच लागते. नाहीतर त्या कोपतात. अशा देवतांना समाजही खूप घाबरतो. कारण या ओंगळ देवतांचा जर क्रोध अनावर झाला आणि त्या कोपल्या तर घरातल्या व्यक्ती आजारी पडणे किंवा मरणे, नैसर्गिक प्रकोप होणे, रोगराई येणे अशा तर्‍हेची संकटे येतील, अशी भिती त्यांच्या मनात दबा धरून बसलेली असते. पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीमध्ये अशाच तर्‍हेने समाजाची उत्क्रांती झाली असल्याने लाचखोरी आणि भ्रष्टाचार मनुष्यजातीच्या रक्तात पुरेपूर भिनलेला आहे. 
             निसर्गाने किंवा देवाने जेव्हा माणूस घडविला तेव्हा एक भलीमोठी मेख मारून ठेवलेली आहे. माणसाव्यतिरिक्त इतर सर्व प्राण्यांना स्वबळावर जगण्यासाठी काहीना काहीतरी असा एक शारीरिक विशेष गूण किंवा अवयव दिले आहे की त्यामुळे त्याला स्वसामर्थ्यावर जगता येऊ शकेल. जसे की वाघसिंहाला तीक्ष्ण नखे आणि दात, हरणाला पळण्याचा प्रचंड वेग, हत्तीला शक्तिशाली सोंड, सापाला विष, जिराफाला उंच मान, काही प्राण्यांना झाडावर चढण्यायोग्य शरीररचना, मगरीला पाण्यात पोहण्यासाठी खवले, पक्षांना आकाशात उडण्यासाठी पंख वगैरे वगैरे. त्यामुळे त्या-त्या पक्षी-प्राण्यांना कुठलाही भ्रष्टाचार न करता जगणे सोयीचे झाले. त्यांना निसर्गाकडूनच स्वतःचे जीवन जगण्याचे हत्यार आणि ते वापरण्याचे कौशल्य मिळाले असल्याने त्यांना त्यांचे आचरण भ्रष्ट करण्याची गरजच भासत नाही. एका सावध प्राण्याने दुसर्‍या बेसावध प्राण्याची शिकार केली तर त्याला खून किंवा प्राणीहत्त्या मानली जात नाही आणी त्यांना निसर्गानेच तशी मुभा दिली असल्याने ते कायद्याचे उल्लंघनही ठरत नाही. म्हणूनच प्राण्यांना पाप-पुण्याच्या कसोट्याही लागू होत नाही. 
            मात्र निसर्गाने माणसाला असा कोणताच अवयव दिलेला नाही की तो त्याच्या साहाय्याने स्वतःची शिकार स्वतःच मिळवून आपले पोट भरू शकेल. माणसाला देवाने वाघासारखे तीक्ष्ण नख, हत्तीसारखे दात किंवा सोंड, मगरीसारखी प्रचंड ताकद यापैकी जरी काहीही दिले नसले तरी त्याऐवजी बुद्धीसामर्थ्य दिले आहे. बुद्धीसामर्थ्य देताना बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा देऊन टाकले आहे आणि इथेच खरी मेख आहे. बुद्धीचा हवा तसा वापर करण्याचे व्यक्तीनिहायस्वातंत्र्य हेच मानवजातीच्या संबंध वर्तनाचे आणि गैरवर्तणुकीचे कारण ठरले आहे. बुद्धीचा वापर कसा करावा याचे नियंत्रण जर निसर्गाच्या स्वाधीन असते तर माणुसकी, सज्जनता, नैतिकता यांच्या व्याख्या करण्याची गरजच भासली नसती. तसेच माणसाने नीतिनियमाने वागावे म्हणून कायदे करण्याची गरजच भासली नसती. माणसाचे आचरण निसर्गाने नेमून दिलेल्या चौकटीतच राहिले असते. 
               माणसाच्या वर्तणुकीचे नियमन निसर्ग करत नसल्याने व आपापल्या बुद्धीचा वापर कसा करावा याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा असल्याने मानवीजीवाच्या व्यक्तीगत हालचालींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक मानवी जीवांच्या समुच्चयातूनच समाज बनत असल्याने प्रत्येक मानवी जीवाने व्यक्तीगत पातळीवर समाजाला पोषक हालचाली करणे म्हणजे नैतिकता आणि समाजाला नुकसान पोहचेल अशी हालचाल करणे म्हणजेच अनैतिकता, अशी एक ढोबळमानाने व्याख्या तयार झाली असावी. समाजरचना ही परिवर्तनशील असल्याने मग नैतिकतेच्या व्याख्याही त्यानुरूप बदलत गेल्या असाव्यात. 
             एखाद्या व्यक्तीने केलेले वर्तन जर उर्वरित समाजाला पीडादायक ठरत असेल तर त्याचे ते वर्तन गैरवर्तन ठरत असते. या गैरवर्तनाचेच दुसरे नाव भ्रष्टाचार असे आहे. मोह आणि स्वार्थ हा सजीवांचा स्थायीभाव असल्याने आणि मनुष्य प्राण्याच्या बाबतीत ज्याचा निर्णय त्यानेच घ्यायचा असल्याने, जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे लपतछपत चौर्य कर्म करून, घेता येईल तेवढा लाभ पदरात पाडून घेणे, ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. ही प्रवृत्ती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणारच आहे. गैरवर्तन किंवा भ्रष्टाचार ही न संपवता येणारी गोष्ट आहे. मात्र समाजहिताच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या मार्गाने व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने लादून भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविणे सहज शक्य आहे. 
             विविधता हा निसर्गाचा मुख्य गूण असल्याने जन्माला येणारी माणसेही जन्मताच नानाविध प्रवृत्तीची असतात. काही माणसे निष्कलंक चारित्र्याची असतात. त्यांना नैतिकतेची चाड असते आणि त्यांच्या मनात समाजाविषयीचा सन्मानही असतो. काही माणसे समाजाला व सामाजिक कायद्याला जुमानत नाहीत पण नैतिकतेला सर्वोच्च स्थान देतात, काही माणसांच्या आयुष्यात नैतिकतेला अजिबात स्थान नसते पण कायद्याला अत्यंत घाबरणारी असतात मात्र माणसांचा एक वर्ग असाही असतो की तो कशालाच जुमानत नाही. ना नैतिकतेला ना कायद्याला. नैतिकतेला आणि कायद्याला न जुमानणारा वर्ग कायमच स्वार्थ साधण्यासाठी संधीच्या शोधात असतो. कायद्यातील पळवाटा शोधून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो.
            मानवी प्रवृत्ती निसर्गदत्त भ्रष्टाचार धार्जिणी असल्याने व प्रवृत्ती व्यक्तीनिहाय विविधतेने नटलेली असल्याने केवळ कायदे करून किंवा निव्वळ नैतिकतेचे धडे देऊन भ्रष्टाचार काबूत येण्यासारखा नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. एवढा विचार केला तर भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यासाठी किती व्यापकपणे पावले टाकण्याची गरज आहे, हे सहज समजून येईल.

__._,_.___
Recent Activity:
MARKETPLACE
A bad score is 598. A bad idea is not checking yours, at freecreditscore.com.

Stay on top of your group activity without leaving the page you're on - Get the Yahoo! Toolbar now.

.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.