Friday, August 19, 2011

मला शाळेत न्या ना

आमच्या मकरंद पंतांना सुचलेली आणि त्यांनी मग लिहून काढलेली हि एक कविता

मला शाळेत न्या ना
बाबा, मी आता मोठा झालो
किलबिल वर्गातून बालवाडीत गेलो
माझ्या इवल्या पाठीवर नवीन दप्तर द्या ना
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना
 
तुमची जुनीच स्कूटर परत नव्याने हसतेय
पाव्हणं नवीन आहे म्हणून अलगद धक्के सोसतेय
शाळेत नेताना मला पुढयात घ्या ना   
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना
 
मी शाळेत पुन्हा एकदा 'नमस्ते बाssss' म्हणीन
मधल्या सुटीत रोज मुरांबा पोळी खाईन
माझं 'ध्यान' पाहून तुम्ही खुदकन हसा ना
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना
 
ते खेळण्यांच दुकान अजूनही तिथेच आहे
तिथले काका तसेच हसरे आणी प्रेमळ आहेत
मी धावेन तिकडे, मला उचलून घ्या ना
 
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना        
 
घरचा अभ्यास मी अजूनही नाहीच केलाय
शाबासकी म्हणून आईने धम्मकलाडू ही दिलाय
ससा कासवाची कविता परत माझ्यासाठी गा ना  
 
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना
 
रिमझिम आठवणीत सरलेत दिनरात्र
मुर्दाड बनलोय मी अन थकलीयेत तुमची गात्र
ते आधारचं बोट पुन्हा हातात द्या ना
 
बाबा, मला पुन्हा शाळेत न्या ना

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.