Thursday, August 12, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} कश्मीरला स्वायत्तता? हद्द झाली!!!(सौजन्य: सामना)


कश्मीरला स्वायत्तता? हद्द झाली!
केंद्रस्थानी बसलेल्या सत्ताधार्‍यांनो, खाली उतरा आणि चालते व्हा! बस्स झाली ही तुमची नपुंसकी धोरणे
शिवसेनाप्रमुखांनी ठणकावले

मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) - कश्मीरला स्वायत्तता? हद्द झाली! देश वाचवण्यासाठी कश्मीरला स्वायत्तता मिळता कामा नये आणि जर दुर्दैवाने दिलीच तर सारा देश कोणत्या खाईत लोटला जाईल याची कल्पना करा असे निक्षून सांगताना 'आता उसळून उभे राहा' आणि कॉंग्रेजी नतद्रष्ट केंद्रीय सत्ताधार्‍यांना खडसावून सांगा, 'आता बस्स झाले, खाली उतरा आणि चालते व्हा' असे जबरदस्त आवाहन आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी केले.
कश्मीरच्या स्वायत्ततेची वळवळ पुन्हा सुरू झाली आहे. त्याचा शिवसेनाप्रमुखांनी खरपूस समाचार घेतला. शिवसेनाप्रमुख म्हणाले, कसली स्वायत्तता आणि कुणाला देता? पूर्वी मरहूम पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात शेख अब्दुल्ला हा त्यांच्या गळ्यातील ताईत होता. त्यांनी स्वायत्तता देऊन शेख अब्दुल्लाला कश्मीरचा पंतप्रधान बनविले आणि सारा देश पेटून उठला. लोकसभेत सार्‍या पक्षांचे खासदार पेटून उठले. एका देशात दोन पंतप्रधान? त्रिवार अशक्य. खासदारांच्या जबरदस्त हल्ल्याने टक्कल असलेल्या नेहरूंच्या डोक्यावरचे उरलेसुरले केसही गळू लागले व त्यांचे स्वायत्ततेचे धैर्यही गळून पडले. कश्मीर स्वायत्ततेची कल्पना कश्मीरच्या बर्फासारखी वितळली व शेख अब्दुल्ला पंतप्रधान न होता मुख्यमंत्री झाले. फारूख व ओमर अब्दुल्ला ही शेख अब्दुल्लांचीच पिलावळ. त्यांच्याही बगलेत ही स्वायत्ततेची पिसे त्यांना गुदगुल्या करीत आहेत, पण ते होणे नाही. दुर्दैवाने या कॉंग्रेजी नतद्रष्ट सत्ताधार्‍यांनी तसे केलेच तर सारा देश पेटून उठेल. या कॉंग्रेजी केंद्रीय सत्ताधार्‍यांची ही पापे पाहा -
* कश्मीरातील हिंदुस्थानद्वेष्ट्या आणि त्यांचे चालू असलेले जात्यंध व धर्मांध जिहादी हल्ले त्यांना आटोक्यात आणता येत नाहीत.
* नक्षलवादी व माओवादींचे हल्ले आज आपल्या जवानांचे बळी घेत आहेत. आपले जवान शहीद होत आहेत हे त्यांना थांबवता येत नाही.
* भ्रष्टाचार फोफावतो आहे त्यात केंद्रीय मंत्र्यांचेच हिस्से आहेत.
* पाकिस्तानचे अतिरेकी हिंदुस्थानात शिरून भयानक हत्याकांड करीत आहेत ते त्यांना आवरता येत नाही.
* हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणार्‍या अफझल गुरूचीही फाशी गेली सात वर्षे झाली तरी अजून दिली जात नाही.
* भयानक हत्याकांड छत्रपती शिवाजी टर्मिनसवर करणारे कसाबसारखे अतिरेकीही सरकारी कोठडीत सुखात नांदत आहेत.
* न्यायनिवाड्याच्या तारखा लांबणीवर पडत आहेत.
* अबू सालेम तुरुंगात मटण-बिर्याणीचे मिष्टान्न झोडत आहे.
* उत्तर प्रदेशात प्रॉव्हिडंट फंडाचा मोठा भ्रष्टाचार झाला आहे त्यात 43 न्यायमूर्ती सामील आहेत. त्यात एक निवृत्त झालेले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तीही आहेत.
* विजेचा तुटवडा, अन्नधान्याचा तुटवडा. रोटी, कपडा और मकान हे तर केव्हाच फासावर लटकले आहे.
* क्रीडा खात्याचा किडा भ्रष्टाचाराच्या शेणात वळवळू लागला आहे.
* पुण्यातील जर्मन बेकरीत स्फोट होऊन अनेक माणसे मेली. त्या गुन्हेगारांचा तपास अजून चालूच आहे.
* आणि आता तर सीबीआय असो वा न्यायालये असो, त्यांनी कॉंग्रेजी सरकारी गुन्हेगारांना क्लीन चिट देण्याचा सपाटाच चालू केला आहे.
* बेघर असलेल्या घरांचा वा गिरणी कामगारांच्या वा मध्यमवर्गीयांच्या घरांचा प्रश्‍न लोंबकळत असताना देशात टॉवर संस्कृती मात्र उभी राहत आहे.

किती सांगायच्या या कॉंग्रेजी सरकारच्या नालायकपणाच्या गोष्टी? केंद्र सरकारपासून ते कॉंगे्रजी राज्य सरकारांपर्यंत हे भ्रष्टाचाराचे उंदीर सार्‍या देशाची जमीन पोखरत आहेत. हे आता अति झाले. कालपरवाकडेच मुंबई समुद्रात दोन जहाजांची टक्कर झाली. त्याअगोदर चेंबूरमध्ये विषारी गॅसची गळती झाली. चेंबूर थोडक्यात वाचले. दिवसाढवळ्या ही जहाजांची टक्कर झालीच कशी? विषारी वायूंची पिंपे समुद्रात पोहू लागली आहेत आणि सार्‍या महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी लागली आहेत असे दाखले देत शिवसेनाप्रमुख उसळून म्हणाले, या कॉंग्रेजी राजवटीत जगणेच कठीण होऊन बसले असताना या देशाचा सत्यानाश उघड्या डोळ्यांनी जनता कशी पाहू शकते याचेच आश्‍चर्य वाटते. निदान आता तरी देश वाचवण्यासाठी कश्मीरला स्वायत्तता मिळताच कामा नये आणि जर दुर्दैवाने दिलीच तर सारा देश कोणत्या खाईत लोटला जाणार आहे याची कल्पना करा. आता उसळून उभे राहा आणि कॉंग्रेजी नतद्रष्ट केंद्रीय सत्ताधार्‍यांना खडसावून सांगा, आता बस्स झाले, खाली उतरा आणि चालते व्हा!

 
॥ निलेश पोटे ॥




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.