वय म्हणजे काय, हे मला तर काही कळत नाही,
पण माझ्या कळण्या-नकळण्यानं ते वाढायचंही टळत नाही...
वय म्हणजे कदाचित वाढत जाणारी सावली असावी,
किंवा असावं उमलत्या कळीचं झालेलं डौलदार फूल,
भ्रमराला जशी गंधाची, तशी
बालपणाला तारुण्याची चाहूल...
काय करू,शब्दात या वयाची व्याख्याही बसत नाही,
वय म्हणजे काय, हे मला खरंच कळत नाही...
वय म्हणजे चंद्रकोरीचं कलेकलेने वाढणं,
की पुनवेच्या रात्री चंद्र अन तारकांचं लख्ख चांदणं?
पण मग इतकं 'सुंदर' वय वाढलं की आपण सुखावत का नाही?
वय म्हणजे काय, हे मला तर अजिबातच कळत नाही...
वय म्हणजे बीजांकुरातून वटव्रुक्ष विस्तारलेला,
किंवा वय म्हणजे सुरवंट 'फुलपाखरू' झालेला?
पण मग त्या फुलपाखरासारखं आपण स्वच्छंद बागडत का नाही?
वय म्हणजे काय, हे मला तर काही कळत नाही...
मी तर बुवा एक ठरवलंय,आहे तो क्षण यथेच्छ जगायचं,
आपलं आयुष्य इंद्रधनूच्या रंगांनी भरून टाकायचं,
कारण कितीही खटाटोप केला तरी वय म्हणजे काय, हे मला कधीच कळणार नाही,
पण माझ्या कळण्या-नकळण्यानं ते वाढायचंही टळणार नाही...
--
सुखाच्या मागे धावून धावून,
मन आयुष्याला विटते,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळ भेटते.........
प्रशांत पवार
कृपया गरज नसल्यास ई-मेल प्रिंट करू नका.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.