kav
प्रत्येक माणूस प्रेम करतो. प्रत्येकाची प्रेम करायची स्टाईल वेगळी असते आणि प्रत्येकाच्या प्रेमाचा रंगही वेगळा असतो. तांबडा ! "मै तुम्हारेलिये जान दे भी सकता हू और ले भी सकता हू" हे या तांबड्या प्रेमींचं ब्रीदवाक्य. एकदा प्रेमात पडले तर त्यांना दुसरं काही दिसत नाही. यांचा माथा नेहमीच गरम असतो. यांना आवडणार्या व्यक्तीकडे दुसर्या कोणी फक्त बघितलं तरी यांच लाल-लाल रक्त ऊकळू लागतं. दुसरं कोणी आपल्या वाटेत येऊ नये यासाठी ते काहीही करू शकतात..
तांबड्या मुलींना सगळ्याच मुली स्पर्धक वाटतात. त्यामुळे इतर मुलींनी वाढवलेले केस हे आपल्याला ऊपटण्यासाठीच आहेत अशी त्यांची समजुत असते. लग्नानंतर तांबड्या बायकांना आपला नवरा म्हणजे एक ढोल वाटतो. त्याने जराजरी आजूबाजूला बघितले तरी त्या आपल्या ढोलाची चामडी तापवून, लाटण्याने बडव बडव बडवतात.
दोन तांबडे कधीही एकत्र राहू शकत नाहीत. चुकूनही जर अशी कल्पना कोणाच्या डोक्यात आली तर "जानी दुश्मन" सारखे चित्रपट जन्माला येतात ! ************************************************************************************************ नारिंगी ! ते रोज जीमला जातात आणि मुलीला इम्प्रेस करण्यासाठी यांच्या गळ्यात वाघाचं नख असलेली जाडी चेन, मनगटाला एक सोन्याचा साखळदंड आणि हातात २०-२५ हजाराचा मोबाईल सर्रास दिसतो. तांबड्यांसारखे भडक नसले तरी या भगव्यांचा मूड नेहमी बदलत असतो. कधी ज्वालामुखीसारखे तप्त तर कधी संत्र्यासारखे थंड असतात. असे बरेच भगवे शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. अंगाने मजबूत असले तरी मनाने हे तेव्हढेच हळवे असतात. मुलगी पटावी यासाठी ते मारुतीला सांगड घालतात! आपलं नशीब आजमावायचं असेल तर कुठल्यातरी बाबाला त्यांच्यासमोर भोंदू म्हणून पहा. पुढची जबाबदारी मात्र माझी नसेल.
एखाद्या प्रेमी त्रिकोण असलेल्या हिंदी पिक्चरला जाताना जी एक तास फक्त मेकअप करेल आणि सिनेमा चालू असताना तोच मेकअप हुंदके देऊन रडून पुसून टाकेल ती १०१ टक्के नारिंगी नार होय. अशा या शेंदरी मुली डोक्याने दगड असतात. सहाजिकच त्या सुंदर असतात. त्यांचा प्रेम करणे हाच उद्योग असतो. काही वाक्य टाकायची असतील तर त्या हिंदीत बोलतात. "तुमपे मैने जितना प्यार किया उतना और कोई नही कर सकता" वगैरे वगैरे. या भगव्या मुली दिवसातुन चार-पाचदा तरी "दिलके तुकडे" वगैरे करत असतील.
दोन भगवेही एकत्र संसार करू शकत नाहीत. ************************************************************************************ पिवळा! मुळातच मुळमुळीत असलेल्या पिवळया प्रेमींच सगळं काही गुपचूप असतं. हे पिवळे प्रेमी एकमेकाला भेटायच्या अशा काही जागा शोधून काढतात की बास रे बास.
पिवळ्यांना थापा मारायची भलतीच सवय असते. म्हणजे त्यामागे त्यांचा काही वाईट हेतू नसतो, पण कोणाला आपलंस करून घ्यायला त्यांच्याकडे फारसे उपाय नसतात. "मी तुला सोन्याने मढवेन", "मी फक्त तुझाच आहे" अशी वाक्य या पिवळ्यांना कोणी शिकवीत नाही.
दोन पिवळे सुखाने एकत्र नांदू शकतात कारण दोन्ही जणं दुसर्याच्या भल्यासाठीच थापा मारत असतात. एखादी थाप पचली नाही तरी फारसा फरक पडत नाही, दुसरी थाप तयारच असते !.. ********************************************************************************************************** हिरवा! बर्याच कारणांमुळे बदनाम झालेला हिरवा, प्रेमाच्या बाबतीत मात्र वेगळाच आहे. हिरवे प्रेमी गडद पण शांत असतात. त्यांना भांडण करायला आवडत नाही. आपल्या प्रेमीची चेष्टा करायला त्यांना प्रचंड आवडतं. त्यांना नाटकात काम करायलाही खूप आवडतं. गावातलं उत्सवाचं नाटकं असो, कुठल्या कंपनीचं नाटक असो किंवा खरं खुरं आयुष्य असो.
हिरव्या मुली रुसव्या फुगव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रेमजीवनातली पन्नाशी नुसती रुसण्यात जाते. त्या कशावरूनही रुसू शकतात. "त्याचा" दिवसातून चारदाच फोन येणे, त्याने दुसर्या मुलीकडे बघणे, पहिल्या भेटीची तारीख विसरणे, नवर्याने आपल्या माहेरच्या कुत्र्याचा वाढदिवस विसरणे, त्याने त्याच्या आईची स्तुती करणे यासारख्या घोर अपराधांना क्षमा नसते. त्यांना समजावता समजावता हाराकिरी पत्करलेल्या अनेक तरुणांना अभ्यास, नोकरी, व्यवसाय यांसारख्या अत्यंत वाईट सवयी लागल्याचे मी खूपदा पाहिले आहे.
दोन हिरवे आपोआपच एकत्र येतात. एकाने चेष्टा करणं आणि दुसर्याने रुसून बसणं यातच त्यांच प्रेम बहरतं ! ******************************************************************************************************** निळा! निळे प्रेमी बर्फासारखे थंड आणि पाण्यासारखे चंचल असतात. त्यांना आपण कवी आहोत अशी पूर्ण खात्री झालेली असते. त्यामुळे कोणाला इम्प्रेस करायला ते कविता लिहितात आणि त्याला किंवा तिला वाचावयास भाग पाडतात. प्रत्येक कवितेत तु, तुला, तुझसाठी, ओठ, प्राण, फुला, भ्रमर असे नवकवींनी ओरबाडलेले शब्द १००% दिसतात. मग समोरच्यालाही "वा काय छान कविता आहे" असं झक मारत म्हणावं लागतं. बरं आणि हा कवितेचा खडा लागला तर लागला, नाही तर तोच ऊचलून दुसरीकडे मारायचा. दोन निळे शक्यतो कधी कवी सम्मेलन भरवत नाहीत ! ******************************************************************************************************** पारवा ! पारवा रंग तुम्ही कधी पाहिला आहे का? पारवे प्रेमीही असेच अदॄश्य असतात. ते एखाद्यावर प्रचंड प्रेम करतात पण ती व्यक्ती समोर आली कि तोंडाला टाळं लागतं.
म्हणजे अशांना शाळेत वर्गातली एखादी मुलगी आवडते. शाळा झाली की तीच मुलगी ज्युनीयर कॉलेजला जाते. हा पण तिथेच दाखला घेतो. मग तिचे मित्र वाढू लागतात. पण "तिने एकदा माझ्याकडे बघून स्माईल दिली" यात त्याचं अख्खं वर्ष जातं. मग बारावी होते आणि ती सिनियर कॉलेज, मेडीकल किंवा इंजिनीरिंगला जाते. आपला हिरो मात्र बारावीतल्या मार्कांमुळे परत बारावी किंवा दुसर्या कुठल्याशा "क्ष" कॉलेजात जातो. खूप प्रयत्न करून तो तिचा नंबर मिळवतो, रिप्लाय येत नसूनही रोज मेसेज फॉरवर्ड करतो, पण तिला मात्र रोज कॉल करणारा कोणी भेटलेला असतो. पण याचं मात्र प्रेम काही कमी होत नाही. मित्रांबरोबर त्याला "ती" किती आवडते, फक्त हेच तो बोलतो. त्याचे मित्रही पारवेच असतात ! त्यांनीही कधिही न केलेल्या "अरे, तिला सिनेमाला येतेस का विचार", "तिला कॉफी साठी भेट की" किंवा "अरे डायरेक्ट विचारून टाक... हाय काय नी नाय काय.." अशा काही टिप्स देतात आणि स्वत:चा विरंगुळा करून घेतात. हा मात्र त्या सगळ्या गोष्टींचा सिरिअसली सिरिअस विचार करतो. असेच दिवस सरकत जातात आणि एक दिवस तिच्या साखरपुड्याची खबर कळते. काही दिवसांनी लग्नही होतं. "मै बस उसे खुष देखना चाहता हूं" हा डायलॉग कोणा पारव्यानेच लिहिलाय यात काही शंका नाही. काही दिवसांनी त्याला दुसरी कोणी "आवडवावी" लागते पण तिला मात्र तो कधीच विसरत नाही.
दोन पारवे आपणहून एकत्र येणं म्हणजे दोन लाजाळुच्या फांद्यानी एकमेकाला जोरात टाळी देण्यासारखं झालं. त्यामुळे पारवे एकत्र येण्यासाठी कोणा कॅटॅलिस्टची गरज लागते. पारव्यांचं एकत्र येण हे कोणा माणसामुळे किंवा घटनेमुळेच होऊ शकतं. म्हणूनच "लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात" यावर त्यांचा सोईस्करपणे विश्वास असतो..... ****************************************************************************************************** जांभळा ! जांभळ्यांचं प्रेम एकदम extreme असतं. प्रेमासाठी किंमती भेट देणे हे त्यांना आपलं कर्तव्यच वाटतं. दुकानात गेल्यावर ते प्रत्येक गोष्टीची पहिल्यांदा किंमत बघतात, मग सगळ्यात महाग वस्तू शोधून ती विकत घेतात आणि आपल्या मित्रांना आपण तिच्यासाठी किती "हज्जार" खर्च केले हे अगदी दिमाखाने सांगतात. त्यांना टापटीप रहायला आवडतं. ते अत्यंत आतल्या गाठीचे असतात. तांबड्यांसारखे धर की मार अशी पद्धत नसते. भगव्यांसारखे ते मजबूतही नसतात त्यामुळे ते diplomatically दुसर्याची वाट लावतात. पिवळ्यांसारखं भलत्याच ठिकाणी गुपचुप प्रेम करायला त्यांना आवडत नाही. एकांत हवा असेल तर ते कुठल्यातरी शांत पण भारी रेस्टॉरंटमधे जातात. हिरव्यांसारखी आपल्या प्रेमाची चेष्टा करायलाही त्यांना आवडत नाही आणि गंमत म्हणून कधी केलीच तर ते लगेच "Just Kidding" म्हणून पुढचे रुसवे फुगवे टाळतात. निळ्यांसारखी कविता करायला जमत नसली तरी चांगली कविता त्यांना नक्कीच ओळखता येते. अशी कुठली कविता त्यांना मिळाली तर ती कविता ते तिला किंवा त्याला फॉरवर्ड करतात. बस.. पारव्यांसारखे ते लाजरे नसतात. कोणी आवडलं की त्या व्यक्तीला ते डायरेक्ट विचारुन टाकतात.
दोन जांभळ्याचं एकत्र रहाणंही कठीण असतं. दोन जांभळे बर्याचदा प्रथम एकत्र येतात पण दोघेही extremist असल्याने भांडणं होतात. जांभळ्यांचं निळ्यांशी चांगलं पटतं कारण निळे शांत असतात. आठवड्यातून एकदा कविता वाचावी लागते एव्हढाच काय तो प्रोब्लेम.... ................................................................. पांढरा |..... "घरचा वैद्य" सारखी पुस्तकं वाचताना जसं प्रत्येक आजारातलं एकतरी लक्षण आपल्यात आहे असं वाटतं किंवा सगळ्या राशींचं भविष्य वाचताना..."अरे, मला असा अनुभव येतोय" असं वाटतं, तसं जर हे प्रेमाचे रंग वाचताना तुम्हाला वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही पांढरे प्रेमी आहात.
काही पांढरे, प्रेमाचे सगळे रंग वापरुन संसाराचं छान चित्र बनवतात किंवा काहीजण जसे सगळे रंग मिळून पांढरा रंग होतो तसे कोरेच रहातात. प्रेमाची रंगपंचमी खेळूनही जर समोरचा "हो" म्हणत नसेल तर मग असे पांढरे मगाचच्या कवितेत हे शेवटचं कडवं जोडतात....
केले जरी हे सगळे, तुझसाठी तरी मी परका रंगलो रंगात सार्या, तरिही कागद मी पांढरा |.....
आता तुम्हीच ठरवा तुमच्या प्रेमाचा रंग कसा? यापैकिच एखादा की सर्वातिल थोडा थोडा मिसळून इन्द्रधनुषी असा ??
|
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.