Thursday, July 8, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} पावसाळी पिकनिक स्पॉट

 




 

घराच्या भिंतींना टेकून बसल्यावर आता घराच्या भिंती गार जाणवायला लागतात. जमिनीचा गारवा शरीरामध्ये भिनायला लागतो. एवढं झाल्यावर मग मन कुठे थाऱ्यावर राहणार.. शहराच्या धुरकटलेल्या सीमा ओलांडून ते केव्हाच ओल्याचिंब हिरव्यागार वाटांवर धावायला लागतं. डोंगरावरून झेपावणारे प्रपात कवेत घ्यायचा प्रयत्न करतं. मन असं दूर डोंगरदऱ्यांत पळून गेल्यावर पाय तरी किती काळ डांबरी रस्त्यांवरून चालणार. कधी सुट्टीच्या दिवशी तर कधी मुद्दाम सुट्टी काढून त्या पावसाच्या सादेला प्रतिसाद देत पायही दऱ्याखोरी पालथे घालायला सुरुवात करतात. या प्रफुल्लित वाटांवरची ही पाऊसगावं.

सह्याद्रीच्या उंच कडय़ांनी वेढलेल्या कोकणचे सौंदर्य सर्वानाच भुरळ घालते. निळ्याशार खाडय़ा व नद्या त्याच्या बाजूला असलेल्या केळी, नारळी पोफळीच्या बागा हे दृश्य नजरेसमोर येताच पाय जागीच थांबतात. याच कोकणला पावसाळ्यात तर हिरवाईचा साज चढतो. उंच कडय़ावरून कोसळणारे धबधबे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, दूपर्यंत पसरलेल्या हिरव्यागार शेतीच्या रांगा हे सारे दृष्य म्हणजे एक लॅन्डस्केप असते. पावसाळ्यात कोकणच्या मंडळींना घराबाहेर पडायला मनापासून आवडत नाही. शेतकरी वर्गाला शेती करणे क्रमप्राप्त असल्याने त्यांना पावसात भिजत कष्टाची कामे करावीच लागतात. मात्र मोठय़ा शहरातील मंडळींना कोकणचा दमदार पाऊस अंगावर घेऊन ओलेचिंब होण्यात मोठी अपूर्वाई वाटते.
मार्लेश्वर : मार्लेश्वर हे कोकणातील प्रसिद्ध ठिकाण. सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या या ठिकाणाचे पावसाळ्यातील सौंदर्य विलोभनीय असते. सह्याद्रीच्या कडय़ावरून कोसळणारा धारेश्वर धबधबा पावसाळ्यात पर्यटकांना अक्षरश खेचून आणतो. मात्र पावसाळ्यात या धबधब्याजवळ जाणे अत्यंत धोकयचे असते हे पर्यटकांनी लक्षात घ्यायला हवं. मार्लेश्वरला जाण्यासाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनला उतरून जाता येते. हे अंतर ३२ किमी. आहे. खुद्द मार्लेश्वर येथे निवासाची सोय नाही, मात्र वाटेत हातीव येथे हॉटेल गिरिराज तर देवरूख येथे राहण्याची सोय होऊ शकते.
आंबा घाट : रत्नागिरी कोल्हापूर मार्गावर आंबा घाट हे पावसाळ्यातील अनोखा आनंद लुटता येणारे एक सुंदर ठिकाण असून थंडगार वातावरण, दाट धुकं आणि जोरदार वारा अशा वातावरणात मन प्रफुल्लित होतं. सह्याद्रीच्या उंच कडय़ावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली पर्यटक स्नानाचा मनसोक्त आनंद लुटत असतात. आंबा घाटात जायचं म्हणजे ओलंचिंब होण्यासाठीच. या घाटाच्या पायथ्याशी म्हणजे साखरपा येथे निवासाची आणि भोजनाची सोयही आहे. संगमेश्वर रेल्वे स्टेशनवरून आंबा घाटात जाण्यासाठी ४५ किमी अंतर पार करावे लागते.
सवतसडा : याला संवतसडा असंही म्हणतात. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण जवळ सवतसडा नावाचा सुंदर व प्रसिद्ध धबधबा असून तो चिपळूण रेल्वेस्टेशनपासून थोडय़ाच अंतरावर आहे. याबद्दल एक आख्यायिका सांगण्यात येते की दोन सवती एकमेकींशी भांडता भांडता या कडय़ावरून खाली पडल्या तेव्हापासून या कडय़ाला सवतसडा म्हटलं जातं. पर्यटकांना या धबधब्याजवळ जाण्यासाठी सोयचीची पायवाट बांधण्यात आली आहे. या महामार्गालगतच्या या धबधब्यावर हजारो पर्यटक या हंगामात येतात. परशुराम घाटातून वशिष्ठी नदीचे दिसणारे दृष्यही मनाला भुरळ घालणारे असते. येथून काही अंतरावर परशुराम मंदिर असल्याने पर्यटक ही तीनही ठिकाणं पाहू शकतात. परशुराम मंदिर तसंच चिपळूण येथे राहण्याची सोय होऊ शकते.
कुंभार्ली घाट : चिपळूण कराड मार्गावरील कुंभार्ली घाट पावसाळ्यात पर्यटकांना अक्षरश वेड लावतो. खोल दरीतून वेगाने घाट रस्त्याकडे येणारे ढग, सोसाटय़ाचा वारा, थंडगार वातावरण, दाट धुकं आणि सह्याद्री पर्वताच्या माथ्यावरून जागोजागी कोसळणारे धबधबे हे येथील खास आकर्षण असते. पर्यटकांनी दरीकडील बाजूकडे न जाता दुरूनच हे दृष्य अनुभवणे आवश्यक आहे. याचबरोबर या घाटात दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्क राहणे गरजेचे असते. कुंभार्ली घाट माथ्यावर व्हॅली व्ह्यू नावाचे हॉटेल असून येथे निवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. चिपळूण रेल्वे स्टेशनपासून कुंभार्ली घाट ३० किमी आहे.
चिपळूणहून रत्नागिरीकडे जाताना पावसात भिजल्याने खूपच थंडावा जाणवत असेल तर वाटेत आरवली येथे महामार्गालगत गरम पाण्याची कुंडं असून येथे थांबता येतं. आंघोळीनंतर येथे स्रियांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याच मार्गावर पुढे तुरळ आणि राजवाडी येथेही गरम पाण्याची कुंड आहेत. मात्र तुरळ येथील पाणी फारच गरम असल्याने येथे स्नान करणे शक्य नाही.
निवळी घाट : रत्नागिरीकडे जाताना निवळी घाटात डाव्या बाजूला सुंदर धबधबा असून वाहणारी नदी, हिरवीगार शेती असे घाटातून जाताना दिसणारे दृश्य पर्यटकांना खिळवून ठेवते. पुढे निवळी येथून उजव्या बाजूला वळल्यावर ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे असून तिथेही जाता येऊ शकते.

भंडारपुळे : गणपतीपुळे जवळील भंडारपुळे आरे वारे मार्गे रत्नागिरीत येण्याचा जवळचा मार्ग उपलब्ध असून आरे-वारे किनाऱ्याजवळून येताना पर्यटकांना येथील निसर्गाचे सुंदर दर्शन होते. रत्नागिरी येथील भगवती किल्ला, मांडवी जेटी, सावरकर स्मारक, टिळकांचे जन्मस्थान, थिबा पॅलेस आदी ठिकाणे पाहिल्यानंतर जवळच १७ किमी अंतरावर असलेले स्वामी स्वरूपानंद मंदिर पावस या प्रसिद्ध स्थानालाही भेट देता येऊ शकते.
ओणीचा धबधबा : रत्नागिरीहून राजापूरकडे जाताना वाटेत ओणी येथे थोडय़ाशा आडमार्गाला सुंदर धबधबा असून पर्यटकांनी ओणी येथे चौकशी केल्यानंतर त्यांना या धबधब्याविषयी माहिती मिळू शकते. येथून थेट सावंतवाडीला पोहोचल्यावर कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर सावंतवाडीपासून ३२ किमी अंतरावर आंबोली हे प्रसिद्ध ठिकाण असून कोकणात पावसाळी हंगामात या ठिकाणावर सर्वाधिक गर्दी असते. अंबोली येथे राहण्याचीही व्यवस्था होऊ शकते.
नवजा धबधबा आणि कोयना धरण : कोकणच्या जवळच कुंभार्ली घाट पार केल्यानंतर कोयना अभयारण्य पाहायला मिळते. पावसाळ्यात रस्त्यालगतच सुरू होणाऱ्या या अभयारण्याची शोभा अवर्णनीय अशी असते. चिपळूण रेल्वे स्थानकापासून कोयना हे अंतर ६५ किमी आहे. कोयनेच्या अलीकडे असणाऱ्या हेळवाक गावामध्ये शासकीय विश्रामगृह उपलब्ध आहे. कोयना धरणाच्या जलाशयाच्या बाजूने नवजा येथे जाण्यासाठी डांबरी रस्ता असून या मार्गावर डाव्या बाजूने सह्याद्रीचे उंच कडे तर उजव्या बाजूने धरणाच्या जलाशयाचा लांबसडक पट्टा असे मनोहारी दृश्य पाहायला मिळते. नवजा येथील धबधबा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धबधबा असून हजारो पर्यटक येथील सुंदर दृष्य पाहण्यासाठी येतात. सह्याद्रीच्या उंच कडय़ावरुन कोसळणाऱ्या या धबधब्याचे तीन भागात विभाजन झाले असले तरी या धबधब्याजवळ जाणं हे धोकादायक आहे. वारा आणि पाऊस असताना एक किमी अंतरापर्यंत या धबधब्याचे तुषार अंगावर उडत असतात.
नवजा येथे जाताना वाटेत अन्य छोटे मोठे धबधबे पाहायला मिळतात. धबधब्यांची सफर झाल्यानंतर परत कोयनेकडे येताना धरणाजवळच नेहरू उद्यान लागते. १० रु.चे तिकीट घेतल्यानंतर हे उद्यान पाहायला मिळते. उद्यानाच्या टोकाजवळ गेल्यानंतर कोयना धरण खूप जवळून पाहण्याची संधी उपलब्ध होते. येथेच धरणाची संपूर्ण माहिती एका स्तंभावर लावण्यात आली आहे. मोबाईलवरून धरणाचे फोटो घेण्याचा प्रयत्त्न झाल्यास कारवाई होऊ शकते. याची दखल घ्यावी. कोयना गावातूनच हुंबरळीकडे गेलेल्या मार्गावर डोंगरावरच पर्यटन विकास महामंडळासह अन्य खासगी निवासस्थानांच्या उत्तम सोयी उपलब्ध आहेत. येथून कोयना धरण आणि नेहरू उद्यानाचे विलोभनीय दर्शन होते.
पावसाळी कृषी पर्यटन
कोकणची खरी संस्कृती कशी आहे हे जाणून घ्यायचे असेल तर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये गिरीश बोंद्रे या शेती तज्ज्ञाने देवघर येथे सुरु केलेल्या कृषी पर्यटन अर्थातच आजोळ परिवाराला भेट देणं उचित ठरेल. संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून देवरुखमार्गे देवघरचे अंतर ३१ किमी आहे. २०० वर्षांपूर्वीचे पुरातन वृक्ष, पक्षी निरीक्षण, आयुर्वेदिक वनस्पती, ११० वर्षांपूर्वीचे खाद्य कोकणी पद्धतीचे घर, पाटाचे पाणी, भातशेतीचे प्रात्यक्षिक, खळखळत वाहणारे ओढे या सर्व गोष्टींचे दर्शन देवघर येथे होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य पर्यटक देवघर येथील आजोळ परिवाराला भेट देण्यासाठी येत असतात. चुलीवरील रुचकर जेवणात कोकणातील विविध पदार्थासह झुणका, भाकरी, गरम मसाल्याची आमटी, थालीपीठ, मोदक आदी पदार्थाची लज्जत येथे चाखता येते. सांस्कृतिक करमणुकीमध्ये संगमेश्वरी बोली हा खास रत्नागिरी जिल्ह्यातील बोली भाषेवर आधारित कार्यक्रम ऐकायला व पाहायला मिळतो. गिरीश बोंद्रे यांच्या आजोळ परिवार या पर्यटनस्थळाशी संपर्क साधण्यासाठी (०२३५४) २४९६१७, २४१०५२ या दूरध्वनीवर संपर्क साधता येईल.
 
धुतपापेश्वर
राजापूर तालुक्यातील धुतपापेश्वर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ राजापूर बसस्थानकापासून केवळ ८ किमी अंतरावर असून येथील पुरातन शंकराचे मंदिर सर्वश्रुत आहे. या मंदिराजवळच वसंत ठाकूर या नखसम्राटांना भेटता येते. डाव्या हाताची नखे वाढविण्यामध्ये त्यांनी विक्रम केला असून पर्यटकांसमोर ते नकलांचा कार्यक्रमही सादर करतात. राजापूर येथे शासकीय निवासस्थानासह अन्य खासगी व घरगुती निवासाच्या सोयी उपलब्ध आहेत.
 
हॅपी व्हॅली
नगर : औरगांबाद महामार्गावरून अवघं दहा किलोमीटर अंतर कापलं की, डाव्या बाजूला वांबोरीकडं जाणारा रस्ता लागतो. या रस्त्यानं फक्त एक किलोमीटर अंतर आत गेलं की दोन छोटेखानी डोंगरांमधल्या अर्धवर्तुळाकार जागेतून रस्ता आपल्याला घेऊन जातो थेट निसर्गाच्या कुशीत. या प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बहरलेल्या वृक्षराईतून जाताना सुरुवातीलाच पिंपळगाव तलाव लागतो. अलीकडेच तलाव भरल्यानंतर सांडण्यातून वाहणारं पाणी रस्त्यावरुनच पुढे ओढय़ाला जाऊन मिळतं. तलावालगतच्या रस्त्यानं पुढे काहीच अंतरावर निसर्गरम्य परीसर डोंगररांगा. नगरच्या मुख्य बसस्थानकापासून फक्त १८ किलोमीटर अंतरावरच हे ठिकाण.  नगर शहरानजीकच असलेल्या गर्भगिरीच्या डोंगररांगा. नाथसांप्रदायात या परिसराचं आगळंवेगळं महत्त्व आहे. कानिफनाथ, गोरक्षनाथ आदींची स्थान याच पर्वतरांगांमधून आहेत. चक्रधर स्वामींचा पदस्पर्श या भूमीला झाल्याचा उल्लेख आढळतो. डोगंरगणा गावाच्या कमानीतून आत शिरलं की, पाचशे मीटर अंतरावर डोंगरात उतरण्यासाठीच्या पायऱ्या आहेत. खाली उतरल्याबरोबर दृष्टीपथास पडतात ते नक्षीदार आकाराचे कुंड, आळी डोंगराच्या कुशीत असलेलं रामेश्वराचं मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन आहे. वाईच्या शेंडे घराण्यानं या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिरासमोरच विश्रामगृहाचं नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे. मंदिराच्या पुढील वाटेनं घळईत उतरायला लागलं की, एक गुहा दिसते. या गुहेला सीता न्हाणी म्हणतात. रामानं सीतेसाठी शरसंधान करून ती निर्माण केल्याचं सांगितलं जातं. तिथून पुढे निघालं की, निरनिराळ्या डेरेदार वृक्षवनराईत पक्षाची किलबिल, बहरलेली रानफुलं असा सगळा माहोल सुरू होतो. अवकाळी पावसातच हा परिसर बहरायला सुरवात होते. पावसाळ्यात घळ्यांमधून वाहणारे छोटे ओहोळ पुढे एकत्र येऊन एका प्रवाहाला सुरुवात होते. मग ठिकठिकाणी मन मोहून होणारे छोटे छोटे धबधबे दिसू लागतात.
डोंगरगण गावापासून सरळ पुढं निघालं की मांजरसुंबा हे गाव लागतं. गावाजवळच एका डोंगरावर असलेली भग्न वास्तू दिसू लागते. या वास्तूला कोण मांजरसुंबा म्हणतं तर कुणी बत्तीबारव म्हणतात. मात्र या वास्तूचं खरं नाव आहे ते मनजर-ए-सुभा. म्हणजे रमणीय दृश्य दिसणारं ठिकाण. ही वास्तू निजामाने उभारलेली असून, आतमध्ये अर्धवट असलेली तटबंदी आणि दोन मजली वास्तूचे भग्नावशेष सध्या शिल्लक आहेत. असं असलं तरी कधी काळी याच वास्तूत खास पावसाळ्यात निजाम परिवारातील शाही व्यक्तींचं वास्तव इथं असायचं. दगड, चुना आणि सागवानी लाकडाचा वापर करुन बांधलेली ही इमारत नव्हे महालच म्हणायला हवा. खेळत्या हवेसाठी खिडक्यांची रचना, प्रासादासमोरचा तलाववजा हौद, पाण्याच्या सोयीसाठी कपारीत असलेले पाण्याचे हौद हे सारं त्या काळातील शाही सौंदर्याची साक्ष देत आजही तिथं उभे आहेत. या महालाला मर्दानखाना असं संबोधलं जायचं. या वास्तूतून आजूबाजूच्या विस्तृत भूप्रदेशावर लक्ष ठेवलं जायचं. निजामानं नगर शहराच्या आसपासच्या डोंगरमाथ्यांचा उपयोग टेहळणी बुरुजवजा पर्यटनस्थळ असा खुबीनं केलेला जाणवतो. समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंचीवर असलेल्या या परिसराचं सौंदर्य पावसाळ्यात जास्तच खलतं. वाऱ्याबरोबर प्रवास करणाऱ्या ढगांआड या वास्तू कधी लुप्त होतात तर कधी लख्ख प्रकाशात आपला दिमाख दाखवतात. मांजरसुंबारला भेट देणं म्हणजे पर्यटनाबरोबर ट्रेकिंगचीही मजा लुटण्यासारखं आहे.
मांजरसुंबाच्या डोंगराकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रस्त्यानं गेलं की सुरू होतो गोरक्षनाथ गडाचा घाट. घाटदार वळणं, खोल दऱ्या या भागाचं सौंदर्य खुलवतात. पर्वतरांगांमुळे वनराईमुळं हा परिसर कायम हिरवागार दिसतो. पावसाळ्यात शेतांमधून साचलेलं पाणी उन्हात अगदी बिलोरी आरशासारखं चमकतं. या भागात दगडांच्या कपारीत साळिंद्रीची बिळं, झाडांवरची बुलबुल पक्षांची घरटी, परीसरातील लांडगे, तरसांचा वावर या गोष्टी इथल्या वन्यजीवांकरता मुक्त संचाराची साक्ष देतात.
गोरक्षनाथ गडाच्या घाटरस्त्यानं जाताना डाव्या बाजूला पाहिलं की, दरीमध्ये विस्कटलेल्या मखमली गालिच्यासारख्या छोटय़ा छोटय़ा घळ्या दिसतात. क्षणभर आपण चंबळच्या खोऱ्यात असल्याचा भास होतो. डोंगरमाथ्यावर पहिले मराठी ग्रंथकार गोरक्षनाथांची समाधी आहे. भव्य प्रासाद असलेल्या मंदीराच्या चोहोबाजूंनी कमरेएवढी संरक्षक भिंत, २ हजार ९८२ फुटांवरून दिसणारा सभोवतालचा विस्तृत परिसर भाविकांना भुरळ पाडतो. दुपारी १२ ते २ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन म्हणजे वनभोजनाचा आनंदच ठरतो.
 
 
निसर्गाच्या कुशीतलं भंडारदारा
अहमदनगर जिल्ह्यातील निसर्गसंपन्न छोटेसे गाव. पण या गावाची महती महान आहे. बॉलीवुडही या गावाच्या प्रेमात पडले होते. हे पर्यटनस्थळ विशेषत पावसाळी सहलीचे ठिकाण म्हणून भंडारदरा अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. भंडारदरा धरणामुळे हा परिसर नावारूपाला आला. शिवाय सह्याद्रीच्या रांगेतील सर्वोच्च कळसूबाई शिखरसुद्धा भंडारदरा परिसरातच आहे. १ हजार ६४६ कि. मी. उंचीचे हे शिखर गिर्यारोहकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण आहे.
भंडारदऱ्याला कसे जाल?
जवळचे विमानतळ- मुंबई १८५ कि. मी
जवळचे रेल्वेस्थानक- इगतपुरी ४५ किमी
मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगरपासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सोय.
कुठे राहाल?
निवासव्यवस्था- एम. टी. डी. सी रिसॉर्ट
फोन नं. (०२४२४) २५७०३२, २५७१७१
याव्यतिरिक्त एमटीडीसीची माळशेज घाट, लोणावळा, खंडाळा, कार्ला या ठिकाणीही राहण्याची सोय आहे.
अधिक माहितीसाठी- www.maharashtratourism.gov.in
गोरक्षनाथ गड उतरून पुन्हा वांबोरी रस्त्याला आपण आलो की, डाव्या बाजूला वांबोरी घाटाची सुरूवात होते. घाट संपला की रस्त्याच्या उजव्या बाजूला उघडय़ावर असलेलं पावन गणपतीचं मंदिर लागतं. इथं थोडी विश्रांती घेऊन मंदिराशेजारच्या रस्त्यानं शंभर मीटर अंतरावर आत डेरेदार वृक्षवल्लरींच्या कुशीत पडणारा डोंगरगणचा मुख्य धबधबा सुमारे पंचवीस फुटांवरून कोसळणाऱ्या या जलप्रपाताचे तुषार लांबूनही अंगावर घेता येतात. उंचावरून पडणाऱ्या पाण्याच्या आवाजाची लय आपल्याला रोमांचित करत राहते. जसं निजामानं या परिसराला मनजर ए सुभा असं नाव दिलं तसं १८१० साली इथं मुंबईहून पर्यटनासाठी आलेल्या ब्रिटिश अधिकारी विल्यम सेली यानी या सबंध परिसराचं नामकरण हॅपी व्हॅली असं केलं. नगरच्या गॅझेटियरमध्ये तशी नोंदही सापडते. परिसरातील छोटे धाबे, हॉटेल्समुळे खवय्येगिरी होते. थोडक्यात पावसाळ्यातील काळे, पांढरे ढग, घोंघावणारा वारा, तांबूस काळ्या कातळातून पडणारे धबधबे, आसपासचा पाचूसारखा हिरवागार परीसर, डोंगरमाथ्यावरच्या वास्तू, त्यामुळं घडणारं थ्रिलिंग ट्रेकिंग, नगर शहरातून बस, खासगी वाहने, दुचाकीवरचा प्रवास यामुळे या परिसरातील पर्यटन आनंददायी ठरतं.
मुशाफिरी चिंब वाटांची!
वैशाख वणवा असह्य़ होत असतानाच एकेदिवशी अचानक काळ्या ढगांची गर्दी होऊ लागते आणि पुढे एक-दोन दिवसांत काही कळायच्या आत 'तो' कोसळायला लागतो..ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद असे एकापाठोपाठ बरसू लागतात.. मातीचा गंध दरवळतो, सृष्टीचा रंग बदलतो, जलधारांचा जन्म होतो, धुक्याचा पदर पसरतो..जणू सारी सृष्टीच या नव्या हिरव्या ऋतुच्या सोहळ्याबरोबर नवचैतन्याचा रस पिऊन दारी अंगणी उभी राहते..अशा या वर्षांकालीच मग कुठेतरी दूर डोंगररानी, फुलांच्या पठारी, धुक्याच्या दुलईत, हिरवाईच्या कुशीत, पाऊस-धबधब्यांच्या साथीला बाहेर पडावेसे वाटते! वाटते ना? चला, तर मग या भिजल्या शरीरांना आणि फुललेल्या मनांना घेऊन या ओल्या वाटा आणि हिरव्या डोंगरांवर!
पाऊस पाहायला नव्हे तर अनुभवायला मन बाहेर पडते. कुठे कुठे हा पाऊस अनुभवता येतो! डोंगरावर, दरीत, गडकिल्ल्यांवर, खळखळत्या नदीच्या काठाशी आणि धबधब्याच्या पायाशी! फुलांच्या पठारावर अन् भाताच्या शेतावर! डोंगररानी-वाडीवस्ती-वाटा अशा साऱ्याच ठिकाणी!
धुंद घाटमाथे : या साऱ्यात पाऊस आल्याची पहिली वर्दी मिळते ती घाटमाथ्यांना! यामुळेच खऱ्या भटक्यांची पावले बरोबर या काळात या अशा घाटवाटांवर रेंगाळतात. सह्य़ाद्रीच्या रूपाने तर जणू साऱ्या महाराष्ट्रालाच असा हा घाटमाथा मिळाला आहे. या माथ्यावर अगदी नाशिक-इगतपुरीजवळच्या कसारा घाटापासून ते अगदी तळ कोकणातील अंबोलीपर्यंत साऱ्याच घाटवाटा वर्षांकाळी पावसाच्या या धुंदीत बुडालेल्या असतात. कसारा, माळशेज, खंडाळा, ताम्हिणी, वरंध, आंबेनळी, कुंभार्ली, आंबा, गगनबावडा, फोंडा आणि अंबोली अशी जणू सह्य़ाद्रीच्या गळ्यातील घाटांची ही माळच! या घाटवाटा एरव्ही उंच कडे आणि दाट झाडीतून वाहणाऱ्या, पण तेच पाऊस कोसळू लागला, की या रौद्र-भीषण दऱ्याखोऱ्यांनाही धुंदी चढते. पश्चिमेक डून पाऊस घेऊन निघालेले ढग या घाटमाथ्यावर विसावतात आणि वैशाख वणव्याने होरपळून निघालेल्या या भूमीला आपल्या असंख्य जलधारांनी न्हाऊ घालतात. पाहता पाहता या डोंगर कातळावरही हरिततृणांची मखमल चढते. त्याच्यावरून पांढऱ्याशुभ्र धबधब्यांच्या माळा रानीवनी हिंडू लागतात. धुक्याच्या दुलईने साऱ्या दऱ्याखोऱ्या भरून जातात. जणू साऱ्या घाटातच पाऊस भरून राहतो आणि मग अशाच वेळी नकळतपणे प्रत्येकाच्या ओठावर कवी ग्रेस गाऊ लागतो..
'पाऊस कधीचा पडतो..'
प्रत्येक घाटावरचे हे चित्र! यातला माळशेज घाट पुण्याच्या जुन्नर आणि ठाण्याच्या मुरबाडजवळ! पुण्या-मुंबईहून तो साधारण १६० किलोमीटरवर! जाण्यायेण्यासाठी एसटी बसची सुविधा आहे. तर राहण्यासाठी इथे एमटीडीसीपासून अनेक लहान-मोठी हॉटेल्स! माणगाव आणि मुळशी दरम्यानचा ताम्हिणी घाट पुण्यापासून साधारण ८० किलोमीटरवर! कोकणात ताम्हिणी घाट मार्गे धावणाऱ्या एसटी बस इथे सोयीच्या. तर इथेही मुळशी परिसरात आता अनेक लहान-मोठी हॉटेल्स उभी राहिल्याने पर्यटकांची सोय होते. भोरजवळचा वरंध घाट तर धुवाँधार पावसासाठीच प्रसिद्ध! साऱ्या घाटभर जाणवणारा धबधब्यांचा नाद अनुभवायचा आणि इथेच तळाशी असलेल्या समर्थाच्या शिवथरघळीत विसावायचे! कोल्हापूरजवळच्या अंबा, गगनबावडा, फोंडा, अंबोली घाटात तर माथ्यावरचा टोचणारा पाऊस आणि त्यापाठी उतरणारे धुके यात बुडायला होते. आता इथेही पर्यटक गर्दी करू लागले आहेत आणि त्यांच्या सोयीसुविधांसाठी 'एमटीडीसी'पासून अनेक खासगी हॉटेल्सनी आपल्या सेवा सुरू केल्या आहेत. अशा या घाटवाटा एरव्ही देश- कोकणात ये-जा करण्यासाठी, पण तेच पाऊस कोसळू लागला, की येत्या-जात्याला थांबवणाऱ्या होतात!
मावळची खोरी : जी गंमत घाटवाटांची तीच या सह्य़ाद्रीकडेने वसलेल्या खोऱ्यांची! नगर-नाशिक-ठाण्याच्या सीमेवरचे प्रवरेचे खोरेही असेच! निसर्गाचे भांडार म्हणून नावही भंडारदरा! पुण्याहून १९० तर मुंबईहून १८५ किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्थळी चहूबाजूंनी डोंगर, त्यावर हरिश्चंद्र, रतन, अलंग, कुलंग आणि मदन अशी गडकोटांची साखळी. कळसुबाईचे सर्वोच्च्य शिखरही याच मांदियाळीत! या साऱ्याच्या मधे पुन्हा तो भंडारदऱ्याचा विशाल जलाशय! आधीच निसर्गरम्य असलेल्या या डोंगररानी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या धरतीचे नंदनवन बनते. या इथेच प्रवरेच्या त्या पात्रात रंधा धबधबा त्याचे ते रौद्र रूप घेत उडी घेतो, धरणालगतचा 'अंब्रेला फॉल' आपली छत्री उघडतो, कोकणकडय़ावरचा तो सुसाट वारा आणि धुके वेगळ्याच जगात घेऊन जाते.. इथे यायचे आणि भंडारदऱ्याचे हे चित्र मनाच्या कोंदनात कायम करायचे!

मॉन्सून केरळ!
उन्हाळ्याच्या दिवसात कोरडी, शुष्क पडलेली कोकणपट्टी पावसाच्या पहिल्या काही सरी पडताच निसर्गसौंदर्याने नटून जाते. लहानमोठे ओहोळ, धबधबे ठिकठिकाणी आपलं लक्ष वेधून घेतात. कोकणात आपल्या गावाला जाणाऱ्यांना हे दृष्य तसं दरवर्षीचंच. पण निसर्गसौंदर्याची ही अनुभूती केवळ आपल्या कोकणात म्हणजे सिंधुदुर्गापर्यंतच नाही तर खाली गोवा आणि अगदी केरळातही अनुभवता येते. या दोन्ही राज्यांत पावसाळ्याच्या दिवसात अप्रतिम वातावरण असते.
महाराष्ट्रातील बहुतेक कुटुंबं नाताळच्या दिवसात गोव्याला जातात. डिसेंबर महिन्यात गोव्यातलं तसंच केरळातलं वातावरण सुखद असलं तरी त्याला निसर्गापेक्षा त्या दिवसांमधलं सांस्कृतिक वातावरणच कारणीभूत असतं. गोव्यात पावसाळ्याच्या दिवसात समुद्र किनाऱ्यावर फिरण्याची मजा काही औरच असते आणि ती अनुभवायची तर जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात तिथे जायला हवं. विशेष म्हणजे हे तीन महिने गोव्याचे ऑफ सिझनचे दिवस असल्यामुळे तेथील हॉटेलांचे दर या महिन्यांत अध्र्यापेक्षा खाली आलेले असतात. त्यामुळेच असेल कदाचित, मुंबईतल्या 'चिनू ट्रॅव्हल्स'ने मॉन्सून केरळ आणि मॉन्सून गोवा अशा दोन टूर आयोजित केल्या आहेत. थ्री नाईट आणि फोर डेच्या या टूर्सचं वैशिष्टय़ म्हणजे ११, २२५ रुपयांमध्ये एका माणसाला विमानप्रवासाच्या खर्चासह ही सहल अनुभवता येणार आहे.
www.chinutravels.com

भंडारदऱ्याकडे येण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर अशा सर्व ठिकाणाहून एसटी सेवा आहे. 'एमटीडीसी'पासून अनेक खासगी हॉटेल्सनीही आपला पायारव इथे केलेला आहे. शिवाय इथल्याच स्थानिक आदिवासी मुलांनीही सह्य़ाद्री संवर्धन सोसायटी अंतर्गत (संपर्क - योगेश कर्डिले - ९४२३७९०९५८) पर्यटकांना सुविधा पुरवण्यास सुरुवात केलेली आहे.
प्रवरेच्या या खोऱ्या अलीकडे जुन्नरप्रांती पायउतार व्हावे. तो पुण्या-मुंबईच्या पर्यटकांनी माळशेजची वाट अगोदरच चिंब केलेली असते. ही गर्दी टाळून ज्यांना पावसाशी निवांत गप्पा मारायच्या आहेत, त्यांनी अलीकडे जुन्नरहून आपटाळे किंवा माणिकडोहहून त्या सातवाहनांच्या नाणेघाटाची वाट पकडावी. साधारण २५ किलोमीटरवरचे हे अंतर एसटीने भर्रकन कापता येते! तेच डोंगर, तोच पाऊस पण इथे सोबतीला असतो तो निवांतपणा! कुकडेश्वराचे मंदिर, चावंड, जीवधन, हडसरसारख्या आडवाटेवरच्या किल्ल्यांचा भाग! जमले तर यातल्या एकाला भेट देत, हिरवी भातखाचरे, वाहत्या ताली आणि धावणाऱ्या ओढय़ांमधून अगदी शेवटी नाणेघाटाच्या टोकावर यावे. सृष्टीचे निर्मळ रूप कसे असते, ते अनुभवावे आणि इथेच घाटातील त्या प्राचीन लेणीत बाहेरचा पाऊस ऐकत झोपी जावे.
जुन्नर सोडून अलिकडे घोड-भीमेच्या खोऱ्यात यावे तो डोंगरीचा डाकिन्या महादेव भक्तांना या निसर्गात बोलावत असतो. इथे येण्यासाठी मंचरहून वाट, अंतर ६५ किलोमीटरचे! भीमाशंकर अभयारण्याचे गच्च रान आणि तेवढाच दाट पाऊस पोखरी घाट चढणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला आधी निसर्गपूजेला लावतो. भीमाशंकर उतरून पुढे खेड तालुक्यात शिरलो तर घाटावरच्या भोरगिरीच्या रांगा पावसात भिजत असतात. इथे येण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरहून वाट वाकडी करायची. चासकमान धरण, मंदोशी धबधबा, भोरगिरीचा किल्ला ही खोऱ्यातील आकर्षणे. अंतर साधारण ४० किलोमीटर. चहा-न्याहरी सोडली इथे या आदिवासी भागात फारशी मोठी हॉटेल्स नाहीत तेंव्हा येतानाच बरोबर डबा-खाऊ घेतल्यास निसर्गाच्या संगती पडणारी पंगत वेगळाच आनंद देऊन जाते.

एमटीडीसी आणि पावसाळी पिकनिक
आंबोली आणि पावसाळी पिकनिक हे एक अनोखं समीकरण. सह्याद्रीच्या दक्षिण रांगांच्या कुशीत दडलेलं हे हिल स्टेशन पाहिल्यावरच त्याच्या सौंदर्याची प्रचीती येईल. आंबोलीला जाण्यासाठी टॅक्सी आणि ऑटोरिक्षा आहेतच, पण जरा वेगळा अनुभव हवा असेल तर घोडय़ावरून किंवा सायकलनेही या ठिकाणी जाऊ शकतो. बेळगाव विमानतळावरून ६४ किलोमीटर अंतरावर आंबोली आहे. कोकण रेल्वेने सावंतवाडी या स्थानकावर आंबोलीला जाण्यासाठी उतरावे. आंबोलीला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या २१ रिझॉर्टस् सर्व सोयींनी उपलब्ध आहेत.
मुख्य आरक्षण केंद्र-
०२२- २२८४५७८
टोल फ्री नंबर- १८००२३३५०५०

पुण्याच्या मावळतीचा मावळ-मुळशीचा भाग म्हणजे तर 'मान्सून पॅराडाईज'! मुळा, पवना आणि इंद्रायणी नदीचे हे खोरे! डोंगरदऱ्या, झाडी, छोटी छोटी खेडी, नद्या, नाले, धरणे, भातशेती, लाल माती यांनी हा सारा भाग अगदी कवीकल्पनेप्रमाणे सजलेला! पाऊस पडू लागला की तो अधिकच तरल होतो. पुण्या-मुंबईचे लोक या मावळातल्याच लोणावळा, खंडाळा, सहाराच्या अ‍ॅम्वे व्हॅलीत येऊन रेंगाळतात, पण खरे तर या प्रदेशातील अन्य कोणतीही वाट या ऋतूत पकडली तर ती तन-मनाला ओलेचिंब केल्याशिवाय राहात नाही. कामशेतहून पवना धरण- तुंग -तिकोना किल्ला, पौडहून -माले-घुसळखांब, पौड-मुळशी - ताम्हिणी किंवा लोणावळा-आंबवणे-सहारा-भांबुर्डे या अशा कुठल्याही वाटेवर निघालो तर पावसाची अनेक रंग-रूपे समोर पायघडय़ा घालून अवतरतात.
गडकोटांच्या या महाराष्ट्रात त्याच्या वाऱ्या करणाऱ्यांचाही एक मोठा संप्रदाय आहे. पाऊस पडू लागला, की त्यांच्या या वाऱ्यांना अधिकच उधाण येते. या मावळातच राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, कोरीगड अशी गडकोटांची मोठी साखळी आहे. यातील राजमाचीला कर्जत नाहीतर लोणावळ्याहून जाणारी पायवाट पकडावी लागते. साधारण पंधरा ते वीस किलोमीटरची पायपीट करावी लागते. पण भोवतीचे हिरवे डोंगर, झरझरणारा पाऊस आणि कोसळणाऱ्या धबधब्यांच्या साथीत हे अंतरही मनाला भुरळ घालणारे ठरते. याचप्रमाणे एन मावळातले तुंग, तिकोना, लोहगड, विसापूरचे गडही हिरवाईत बुडालेले असतात.
पुण्याजवळचा सिंहगड देखील असाच वर्षांकाळी प्रत्येकाला खुणावणारा! पाऊसकाळी इथे यायचे, त्या धुकटपावसात फिरायचे आणि इथली कांदा भजी आणि फक्कड चहा खात खाली उतरायचे हा अनेकांचा गेले अनके वर्षांचा नित्यक्रम आहे. याशिवाय गुंजन मावळातील राजगड, तोरणा, सासवडजवळचा पुरंदर हे गिरीदुर्गही डोंगरदऱ्यात भटकणाऱ्यांचे खास आवडीचे. पण इथे येताना थोडय़ाशा गैरसोयीलाच सोय मानून येण्याची तयारी ठेवली तर मग या गडकोटांवरचा 'श्रावण'ही तुमचे मन हिरवे करून सोडेल. भोरच्या पश्चिमेकडे हिरडस मावळही असाच पावसाळ्यात भटक्यांच्या पावलांना खुणावणारा! रोहीडा किल्ला, रायरेश्वरचे पठार भोरपासून वीस-पंचवीस किलोमीटर अंतरातील! जाण्या-येण्यासाठी एसटीची सुविधा. इथेच पुढे वरंध घाटातील तो धबधब्यांचा खेळ पाहण्यासाठी अवश्य जावे. घाटातील त्या वाघजाईच्या मंदिरासमोर उभे राहत समोरच्या काळ नदीच्या खोऱ्यात नुसते डोकावले तरी त्या उंचच उंच कातळावरून खोल कोसळणाऱ्या असंख्य जलधारांचे ते तांडव पोटात धडकी भरवते! या घाटाखालीच समर्थाचे सानिध्य घेत शिवथरघळीची जलाधारा शांत आणि लयबद्धपणे कोसळत असते.
भोरच्या पलीकडे साताऱ्याच्या हद्दीत उतरलो की पावसाळ्यात आठवण होते ती कास, ठोसेघर आणि पाटेश्वर डोंगराची! या तीनही ठिकाणांची ती स्वतंत्र ओळख! कास साताऱ्याहून २५ किलोमीटरवर! पाऊस थोडासा स्थिरावला की एरवी उघडय़ा-बोडक्या असणाऱ्या या पठारावर रानफुलांचा सोहळा भरतो. शेकडो जातीची हजारो-लाखो रानफुले त्यांचे डोळे उघडतात. मग हा रम्य सोहळा पाहण्यासाठी साताऱ्याजवळचे कासचे हे पठार निसर्गप्रेमींच्या गर्दीने फुलून जाते. शेकडो जाती, शेकडो रंग आणि हजारो छटा.. इवल्याशा या आकृत्या, पण भल्याभल्यांना दखल घ्यायला लावतात.
साताऱ्याजवळचा पाटेश्वरचा डोंगरही असाच! त्याच्या पोटात खोदलेली ती लेणी आणि त्यातले ते शिवाचे (शिवलिंगाचे) असंख्य आकार पाहतानाच पावसाळ्यात इथे आलो की सारा भवताल सोनकीच्या फुलांमध्ये न्हाहून निघालेला दिसतो.
या साताऱ्याजवळच सज्जनगडच्या पुढे ठोसेघर नावाचे छोटे गाव. पण इथे कोसळणाऱ्या त्या भल्यामोठय़ा धबधब्यामुळे ते साऱ्या महाराष्ट्राला परिचित झाले. तीन ठिकाणहून येणाऱ्या या त्रिधारेत जणू महिषासूरमर्दिनीचेचे ते रौद्र रूप साठवल्याचा भास होतो. असा हा पाऊस! साऱ्या सृष्टीला नवचैतन्यात बुडवतो. शहरातील लोक त्याला नाके मुरडतात! तो त्याला आणि ते त्याला भिजवून-वाचवून नकोसे करून सोडतात. पण तेच थोडेसे गावाबाहेर, निसर्गाच्या सान्निध्यात, डोंगर-दऱ्यांच्या कुशीत गेलो की तो बालू लागतो, त्याच्या गमती दाखवतो, मग कुठे झरझर, रिप-रिप तर कुठे संततधार.. धबधब्यांचा गोंधळ, धुक्याची दाटण, मऊशार हिरवी मखमल, रानफुलांची सजावट हे सारे पाहता -पाहता आपणही त्या वाटेवर चिंब भिजून जातो. ओल्या वाटा आणि हिरव्या डोंगरांवरचा हा प्रवास, पण पुढे वर्षभर जगण्याचा श्वास देऊन जातो.


धन्यवाद ,
आपला कृपाभिलाषी
दत्तप्रसाद बेंद्रे




--
NITIN LABDE

__._,_.___
Recent Activity:
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------Group Policies (Amended March 04, 2007)

1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.

2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.

3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.

4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.

5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
.

__,_._,___

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.