सकाळची गोष्ट
हगण्याशी निगडित काही लिहिणं आपल्याकडे शिष्टसंमत नाही. खरंतर हगणं हा शब्दही वापरणं प्रशस्त समजलं जात नाही.
पण कवी अशोक नायगावकर थोडी धिटाई करून सहज म्हणून जातात..
सरकारने जगायची नाही तरी हगायची सोय केली हेही काही कमी नाही..
या सरकारी कृपेचा दृष्टांत नायगावकरांनी दिल्यापासून मध्यमवर्गीयही मोकळेपणाने हा शब्द वापरू लागलेत हेही काही कमी नाही.
तसे गेलाबाजार प्रात:विधी, शौचक्रिया असे सभ्य-सुसंस्कृत शब्दही वापरात आहेत. बोलीमध्ये संडास असा छान शब्द आहे. पण तोही लिहिताना वापरू नये असा उगीच एक संकेत पडून गेलाय. हार्बर लाइनवरचं एक स्टेशन
आहे.. सॅँडहर्स्ट रोड. पण बोलताना अनेक लोक त्याचा संडास रोड असा उच्चार करतात. जाहीरपणे आणि टेचात हा शब्द या स्टेशनच्या निमित्तानेच उच्चारता येतो. आपल्याकडे संडास शब्द प्रचलित नसला तरीही मलेशियात आपल्या भारतीयांनीच नेलेल्या संडास या शब्दावरून टंडास हा शब्द बऱ्यापैकी रूढ झालाय. आणि तिथे आंतरराष्ट्रीय विमानतळांवरही ठळक अक्षरात शौचालयावर 'टंडास' असं लिहिलेलं आढळतं. आपल्याकडे अशी कल्पना तरी करून बघा.
परसाकडे हा शब्द कोकणच्या बाजूला आणि झाडय़ाला हा शब्द देशाच्या बाजूला मराठी मातीत या प्रक्रियेसाठी वापरला जातो.
माती आणि या प्रक्रियेचा जुना सबंध. परसाकडे असं म्हटलं की त्यातच ही गोष्ट उघडय़ावर करण्याची आहे हे सिद्ध होतं. उघडय़ावर ही क्रिया केली नाही अशी व्यक्ती भारतात सापडणं दुर्मिळ. नव्या पिढीतील काहीजणांचा अपवाद.
चाळींच्या संडासात बसणं कठीण असल्याने व्हरांडय़ात बसून वर्तमानपत्रावर ही क्रिया करण्यात अनेकांचं बालपण गेलेलं असू शकतं. ज्यांना ग्रामीण टच होता किंवा मामाचा गाव होता त्यांना केळीच्या बागा किंवा नदी-ओढय़ाच्या काठी किंवा पऱ्ह्याकडे भावंडांसह समूहाने जाण्याताला आनंद कदाचित गवसलाही असेल. थंडीत, वाऱ्या-पावसात मोकळ्या वावरात कटिबंध अनावृत करत उदराचा भार हलका करण्यातली मजा हरवत चाललीय असा नॉस्टॅल्जियाही जपणारे खूप आहेत.
अशा अडचणीच्या प्रसंगी कशी कुणाच्या मागे म्हैस लागली होती, याचे किस्सेही घरांमध्ये रंगत असतील. क्वचित बकाल नागरीकरणाच्या वाटेवरच्या एखाद्या मोठय़ा गावातल्या डुकरांचेही अधाशी किस्से ऐकू येतात. परसाकडे जाताना पाणी घेऊन जाण्याच्या पद्धतीतूनही बदलत्या संस्कृतीची झलक दिसून येते. फार पूर्वी परसाकडे जाण्याचा वेगळा तांब्या राखून ठेवलेला असायचा. तांब्या ठेवायच्या कोनाडय़ातच राखुंडी नारळाची शेंडी वगैरे 'जाऊन' आल्यानंतरच्या स्वच्छतेची सोय असायची. मग तांबे गेले. त्यांची जागा जर्मेनिअमच्या डब्यांनी घेतली. त्याला टमरेल असा एक शब्द रूढ झाला. हळुहळू नागरिकरणाच्या झपाटय़ात डालडय़ाच्या किंवा रंगाच्या डब्यांनी टमरेलांचं रूप घेतलं. कालांतराने प्लास्टिकची कडय़ांची टिकाऊ टमरेलं आली ती अजूनही टिकून आहेत. संस्कृती कशी युजरफ्रेण्डली असते याचा हा नमुना.
अर्थात उघडय़ावरच्या शौचात गमतीचा भाग खरं तर फार थोडा. अडचणीच अधिक. अनेक ठिकाणी पाणीच उपलब्ध नसायचं. त्यामुळे झाडाचा पाला किंवा माती किंवा दगड वापरण्याचा प्रघात जवळजवळ सर्वत्रच. आपल्या लोकसंख्येला असलेल्या आतडय़ांच्या आणि जंतुसंसर्गाच्या रोगाचं मूळ या पुरातन सवयीत आहे. दगड-मातीतून मोठय़ा आतडय़ातून अनेक जंतू प्रवेश करतात. लोकांची ही सवय माहीत असलेले देशी डॉक्टरही आता राहिले नाहीत.
एकूणच उघडय़ावरचं हगणं आपल्या परंपरेत होतं पण लिटरेचरमध्ये ते आलं नाही. टोपलीच्या संडासाची ऐशही वाडय़ातल्या फार थोडय़ा घरांना. स्लमडॉग मिलिअनेरमध्ये दाखवलेला प्रसंग धारावीचं गलिच्छ रूप दाखवणारा म्हणून टीकेस पात्र ठरलाही असेल, पण तरीही हगणं ही उघडय़ावरची गोष्ट होती आणि देशाची लोकसंख्या जशी वाढत गेली तशी ती गोष्ट करण्यात अनंत अडचणी वाढत गेल्या.
नागरिकरणाच्या धबडग्यात मैल्याशी निगडित गोष्ट असल्याने घाण, गलिच्छ, अॅऽऽक असं काहीतरी असल्याने हा विषयही क्षुद्र मानला गेलाय. तरीही आपल्या देशात अजूनही लोक हगणं सिरीअसली घेत नाहीत. ती कशीबशी चोरून अंधारात उरकायची गोष्ट आहे असा आपला शतकानुशतकांचा समज. इतका खोल रुजलेला हा प्रभाव असा एकदम जाणारही नाही. चाळीतल्या सार्वजनिक संडासातही लोक प्रायव्हसी टिकू देत नाहीत. एकाही संडासाच्या कडय़ा कधी लागत नाहीत. दारांना फटी आणि भोकं पाडली जातात. आतल्या माणसाला दम खाऊन हॅण्डल धरून बसावं लागतं. बाहेरच्यानं जोरात ओढलं की साराच पंचनामा.
आता फ्लॅट संस्कृतीत आपण स्थिरावलो तरीही तिथेही कमोड की कंबरमोड हा सनातन प्रश्न अजूनही भेडसावतोय. जुन्या पिढीला एकीकडे अस्मितेच्या मुद्दय़ावर आपली भारतीय पद्धतच आपलीशी वाटते. तर गुडघेदुखीमुळे कमोड हे अधिक सोयीचं ठरू शकतं. त्यावरून घराघरात खडाजंगी सुरू असते.
त्यामुळे आपण हगण्याला एका ओशट विनोदाचं रूप दिलंय. आपल्यासाठी ही हसण्यावारी घेण्याची गोष्ट आहे. स्वतंत्र भारतात अगदी नेहरूंच्या काळापासून रस्त्यावर विधिवत् बसलेल्या माणसाचा विनोद प्रचलित आहे. आणि वाईट याचं वाटतं की आजही हा विनोद सांगताना नव्या पिढीला संदर्भ समजावून सांगावे लागत नाही.
हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे. आजही आपल्या देशातले निम्मे लोक उघडय़ावर शौचाला बसतात. आणि आजही आपल्याला त्याचं काहीही वाटत नाही. ही आपल्या दृष्टीने समस्याच नाही जणू!
अगदी शहरातही रेल्वेलाइन आणि रस्त्याच्या कडेला शौचाला जाणारी प्रचंड मोठी लोकसंख्या आहे आणि हागणदरीमुक्त गाव ही संकल्पना आजही पूर्णत: प्रत्यक्षात येऊ शकलेली नाही.
एकीकडे शहरांमध्ये फ्लायओव्हर आणि मोनोरेल प्रकल्प राबवले जात असताना त्याच पुलांखाली सकाळी शौचाला बसलेले लोक दिसतात. विकासाचं इतकं विसंगत रूप इतरत्र कुठेच बघायला मिळत नाही.
ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कुल्र्याजवळ फ्लायओव्हरखालचा अख्खा रस्ता सकाळी घाणीने भरलेला असतो. त्यावरूनच सगळ्या गाडय़ा जातात. ट्रॅफिक जॅम झालं तर गाडय़ा त्यावरच उभ्या असतात. पण कुणाला त्याचं काहीही नसतं. चारचाकी गाडय़ांचे एसी ढणाणत असतात, त्यामुळे त्यांना फरक पडत नाही आणि दुचाकीवाल्यांना थांबायला वेळ नसतो. बाकी तिथे कुणी पादचारी जात नाही. जाण्याचं धाडस करू शकत नाही.
पाऊस सुरू झाल्यावर उघडय़ावर शौचाला जाणाऱ्या लोकांची काय अडचण होते याची शौचकूपातल्या जगाला कल्पनाच नसते. त्यातही बायकांची मोठीच अडचण असते. जेव्हा एखादी लोकल येते तेव्हा या बायका ही शौचाची प्रक्रिया थांबवून उभ्या राहतात आणि मग लोकल निघून गेल्यावर त्यांना पुन्हा बसावं लागतं. रेल्वेलाइनवर शौचाला जाणाऱ्या बायकांना खूप वेगळी सिद्धी प्राप्त करावी लागते. हे खूप पर्सनल वाटलं तरी खूप क्रूर आहे म्हणून सांगावं लागतंय. लाजेकाजेस्तव बऱ्याचदा पहाटे अंधारात उठून त्यांना जावं लागतं. अशावेळी सोबतीला कुणी तरी घेऊन जावं लागतं. एकटीलाच शौचासाठी जाण्याची वेळ आली तर वस्तीतल्याच डोळा ठेवून असलेल्या कुणाच्या तरी वासनेची शिकार होण्याचा धोकाही असतोच. अनेक ठिकाणची सार्वजनिक संडासं अशा अस्फुट कथा पोटात साठवून उभी आहेत.
यातला अस्वच्छतेचा, अशोभनीयतेचा आणि अनारोग्याचा प्रश्न तूर्तास बाजूला ठेवू. दोन आकडी विकासदराचं टारगेट जपणाऱ्या आपल्या देशातल्या प्रत्येकाला सकाळी एक शौचकूप उपलब्ध होणं ही कठीण गोष्ट आहे का?
या सगळ्या गोष्टी लज्जा आणि आत्मसन्मानाशी निगडित नाहीत का?
धन्यवाद ,
आपला कृपाभिलाषी
--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......
1) All mails are subjected to moderation. This may cause some trivial delay in posting your mails. Please bear with us.
2) Please do not post any advertisements (matrimonial ads, mails publicizing other groups etc.) on this group.
3) Please be cautious while sending any attachments or forwards. When you send forwards, we request you to retain only the relevant content of the mail, which you are forwarding. Also edit the subject giving a proper subject to the mail discarding unwanted matter. This will make the mail neat and legible.
4) Appreciation of mails sent by members should be directed to the senders personal email address and not on the group.
5) Not all forwards will be approved. Only forwards with some novelty will be approved. To give an example, forwards containing PowerPoint slides. Some slides contain only sceneries, pictures of cute dogs/ cats, babies, mountains, flowers etc. Such forwards will not be approved.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.