Wednesday, September 8, 2010

{http://www.kavyatarang.co.cc/} Vacha ani Thanda basa !!!


माझ्या वाचण्यात आलेले एक लिखाण ...
॥ निलेश पोटे ॥


 
 
 
 
Vacha ani Thanda basa !!!
 


 

परवा एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज!

ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली
सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतातशेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे.

संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात
आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा
संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते.

स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक
स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो
मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोडपाशी येऊन थांबलाय
तिथं देशद्रोह्याना मिळणार्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या देशप्रेमी, कायदापालक सज्जनांनाही वाटू लागलाय.

तुम्ही लिहिलंत गीतारहस्य
गीतेतली बरीच रहस्ये आता नव्याने उलगडू लागली आहेत
कौरवपांडव उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत, तर युती करुन सत्ता भोगतात
"आप्तस्वकीयांशी कसा लढू" हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला
बाप, भाऊ, मामा, काका, गुरू - कुणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन
वस्त्रहरण तर नित्याचंच झालं आहे
पण कृष्णानं पाठवलेली वस्त्रं कधीच पोचत नाहीत, कुठल्याच द्रौपदीपर्यंत

टिळक, आता "केसरी" शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला
डरकाळ्या फोडणार्या कुठल्याच सिंहाचा आता भरवसा उरला नाही
सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचे मांजर बनून जातील
चिंतन, मनन आणि हवापालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन रहायचात ना टिळक?
तिथली हवासुद्धा आता खूप पालटली आहे.
गडाच्या पायथ्याशी आता रेव्ह पार्ट्या चालतात
सिंह तर तेव्हाच गेला, गड राखणंही आता कठीण झालं आहे.

तुम्ही सार्वजनिक केलेला गणपतीउत्सव खूप लोकप्रिय होतो आहे दिवसेदिवस
प्रत्येक गल्लीचे, बोळाचे स्वतंत्र गणपती झालेत
आता गणपती बुडवायला समुद्रही अपुरे पडणार बहुतेक

"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा प्रश्न तुम्ही केला होतात
आता सरकारचे डोकेच काय, सरकारच ठिकाणावर नसते
सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना
आठवडी बाजारासारखा घोडेबाजार भरलेला असतो तेजीत

इंग्रजांना हाकलल्यानंतर आम्ही मुलांना आता इंग्रजी शाळेत घातले आहे
त्यांना विलायतेला धाडायची खूप धडपड चालली आहे आमची
एकदा ती विलायतेला गेली की भारतदेश, मराठी भाषा, मराठी आईबाप
सारंच परकं होईल त्यांना
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तशी त्यांना फारशी माहितीही नाही
मग कुठले टिळक, कुठला एक ऑगस्ट आणि कुठलं काय

एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक
टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!

 


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.